महापालिकेकडून वाघोलीतील ड्रेनेजलाईन कामांसाठी निधी

पुणे – महापालिकेवर प्रशासकांची नियुक्‍ती करण्यात आल्यानंतर पालिकेत समाविष्ट गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ओरड होत असतानाच प्रशासक विक्रम कुमार यांनी वाघोली परिसरातील ड्रेनेजलाईन विकसीत करण्याकरिता अर्धसंकल्पानुसार मंजूर निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी वितरीत करण्यासह सदर काम तातडीने सुरू करण्याचे आदेश संबंधीत विभागास देण्यात आले आहेत, असे जि.प.सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.

महापालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोलीतील मुख्य समस्या ड्रेनेजलाईनच्या कामांसाठी ज्ञानेश्‍वर कटके यांनी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर अर्धसंकल्पपूर्व बैठकही घेण्यात आली होती. त्यानुसार अर्धसंकल्पात वाघोलीतील ड्रेनेजलाईनसाठी निधी मंजूर करण्यात आला. परंतु, त्यानंतरच्या घडामोडीनंतर पालिकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हा प्रश्‍न रेंगाळला. पावसाळ्यात या समस्येने पुन्हा डोके वर काढल्याने कटके यांनी आयुक्‍तांची भेट घेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, यानुसार उपलब्ध निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत कटके यांनी सांगितले की, वाघोली गावामध्ये बहुतांश ठिकाणी मागील वर्षी पावसाळ्यात ड्रेनेज व पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक बंद झाली होती, नागरिकांच्या घरामध्ये पाणीही शिरले होते. त्यावेळी पालिका प्रशासनाच्या सदर समस्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, या ठिकाणी कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. यापार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांची भेट घेत वाघोलीमधील वीज महावितरण कार्यालयासमोर, सातव वस्ती रस्ता, नगररोड कमलबाग सोसायटी, काळे ओढा, नगररोड पानमळा ते चोखीदाणी मुळामुठा नदीपर्यंतचा ओढा, संत तुकाराम नगर संपवेल सफाई या ठिकाणी पावसाते पाणी तसेच ड्रेनेजलाईनची कामे त्वरीत कामे करावीत, अशी मागणी केली. याची सकारात्मक दखल घेत आयुक्‍त विक्रम कुमार यांनीही अर्धसंकल्पानुसार उपलब्ध निधी मलनि:सारण विभागास वितरीत करण्याच्या तसेच सदर कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या 2022/2023च्या अंदाजपत्रकात पुढील प्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे.

1) पान क्र. 30 एक्‍सई 23 अ 117/2-387 मलनि:सारण विभागाची अचानक उद्धभवणारी कामे करण्यासाठी 2 कोटी रुपये 2 कोटी.

2) पान क्र. 36 एक्‍सई ब 102/ डी 2-421 वाघोली येथील अभिरुची हॉटेल ते म्हसोबा मंदिर, हॉटेल सुप्रिया ते म्हसोबा मंदिर, एसार पेट्रोल पंप ते बापू हरगुडे इमारत बाएफ रोड ते दादा सातव घरापर्यंत अंतर्गत तथा मुख्य वाहिनी नेटवर्क विकसित करणे रक्कम रुपये 10 कोटी.

3) पान क्र. 36 एक्‍सई 16 बी 102/डी 2-422- वाघोली येथील युनिक सोसायटी, फुलमळा रोड, कापुरी विहिर धवल तिर्थ ते सांडवा नदीपर्यंत मुख्य वाहिनी नेटवर्क विकसित करणे 10 कोटी रुपये.

4) पान 36एक्‍सई 16 बी 102/डी2-424- पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट गावामध्ये मास्टर प्लॅननुसार ड्रेनेजलाईन विकसित करणे व मैलापाणी शुध्दीकरण केंद्र उभारणे- 100 कोटी रुपये.

5) पान 36 एक्‍सई 16 बी 102/डी2-361- पुणे मनपा हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट गावांमध्ये मास्टर प्लॅननुसार ड्रेनेज लाईन विकसित करणे व मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे- रक्कम रुपये 100 कोटी.