Pankaja Munde : पंकजा मुंडेंसाठी लोकवर्गणीतून निधी; “वैद्यनाथ’ कारखाना वाचविण्यासाठी जमा केले लाखो रुपये

Pankaja Munde – मराठवाड्यातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या चर्चेत आहेत. मागील आठवड्यात त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून 19 कोटी थकीत रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली होती.

त्यानंतर त्या माध्यमांपुढे व्यक्त होत मी खरच आर्थिक संकटात आहे असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडेसाठी लोकसहभागातून लोकनिधी उभारल्या जात असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी निधी उभारण्यात डॉ. शालिनीताई कराड 50 लाख, राजाभाऊ दगडखैर 11 लाख 11 हजार 111, दत्ता बडे 1 लाख 11 हजार, विजय गोल्हार 11 लाख,

युनुसभाई शेख 11 लाख, कासेवाडी ग्रामस्थ 7 लाख 20 हजार, रामदास बडे 5 लाख, संदिपान ठोंबरे 5 लाख अशा अनेक कार्यकर्त्यांनी पैसे देऊ केले आहेत.

मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस पाठविण्यात आली होती. युनियन बॅंक ऑफ इंडियाने त्यांच्या साखर कारखान्यातून कर्ज थकवल्या प्रकरणी जप्तीची कारवाई केली आहे. जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयांचा कर न भरल्याची नोटीस बजावली आहे.

पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे आपल्या कारखान्याला मदत करण्याची विनंती केली होती. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर मुलाखतीत आपण आर्थिक विवंचनेत असल्याचे पंकजा यांनी म्हटले होते.