पुणे | भावी नोकरदारांना नोकरी आधीच ठेच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सरकारी नोकरी लागल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते आणि तेही सरकारी रुग्णालयातूनच घ्यावे लागते. पुण्यात ससून रुग्णालयात मात्र या भावी नोकरदारांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी एवढ्या चकरा माराव्या लागतात की, नोकरी आधीच ठेच लागल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

ज्यांना सरकारी नाेकरी लागली आहे त्यांची आराेग्य तपासणी करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात येते. परंतु, येथे या भावी नाेकरदारांना तपासणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तपासण्या करण्यासाठी विविध कक्षांचे नंबर दिले जातात. कक्ष शोधत गेले तर त्याचा सिक्वेन्स नसल्याने नेमका तो कुठे आहे हेच सापडत नाही, त्यामुळे तो शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागते, अशी तक्रार करण्यात आली आहे.

राज्यसेवा तसेच केंद्रीय लाेकसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि त्यांची नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना तसेच पाेलीस आणि सैन्यदलात भरती झालेल्या उमेदवारांना सरकारी रुग्णालयातून फिटनेस सर्टिफिकेट देणे बंधनकारक असते. त्यासाठी त्यांना ससून रुग्णालय तसेच औंध येथील जिल्हा रुग्णालय येथे पाठवले जाते.

यामध्ये विविध तपासण्या कराव्या लागतात. डोळे, हृदय, कान, रक्त, लघवी, मानसिक स्थिती, विविध आंतरिक अवयवांची सोनोग्राफी यासह अन्य तपासण्यांचा यात समावेश असतो. या तपासण्यांचे कक्ष ससूनच्या वेगवेगळया इमारतीमध्ये आहेत. या युवकांना केवळ केवळ खाेलीचे नंबर दिले जातात. मात्र, काेणती तपासणी कशासाठी आहे याची माहिती दिली जात नाही. तसेच हा कक्ष काेठे आहे हे त्यांनाच शाेधावे लागते.

या उमेदवारांना तपासणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना माहिती मिळावी, यासाठी संबंधित कक्षावर माहिती फलक लावण्यात येतील. – डाॅ. अजय तावरे, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय