nagar | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर गजेंद्र क्षीरसागर नियुक्ती

नगर, (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. ग्राहक पंचायत राज्याचे नगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर तसेच जिल्हा संघटक प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णय नुसार प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यानुसार या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी असतात. शासनाच्या विविध खात्याचे प्रमुख या समितीमध्ये शासकीय सदस्य असतात.

ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर, जिल्हा संघटक डॉ. राजेंद्र कळमकर, रणजीत श्रीगोड, डॉ. गोरख बारहाते, उमा मेहेत्रे, बाबासाहेब भालेराव आदींचा समावेश आहे.

या निवडीबद्दल डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, महिला संघटिका मेधा कुलकर्णी, नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, विभाग संघटक संजय शुक्ला, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सोनार, ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ वाघमारे आदींनी अभिनंदन केले आहे.