गणपती बाप्पा मोरया…! एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती

आळ्यात प्राचीन मंदिर ः नवसाला पावणारा अशी बाप्पाची ओळख
बेल्हे –
जुन्नर तालुक्‍यातील आळे येथे स्वयंभू पांदिचा गणपती हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. एकाच मंदिरात बाप्पाच्या दोन शेजारीच मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे येथे येणारे भक्तगण सांगतात. तर याठिकाणी पूर्वी पांदिचा रस्ता होता म्हणून या मंदिराला पूर्वी पासून स्वयंभू पांदिचा गणपती असं नाव पडलं आहे.

संकष्टी चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी, अंगारक चतुर्थी, विनायक चतुर्थी, गणेश जयंतीला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते व महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. नवसाला पावणारा गणपती अशी या बाप्पाची ओळख असल्याचं येथे दर्शनाला येणाऱ्या महिला सांगतात. येथे वर्षभर सकाळी व संध्याकाळी आरती असते. गणेश उत्सवाच्या काळात येथे 10 दिवस महाआरती असते.

तसेच रोज पहाटे साडेपाच वाजता अभिषेक असतो व संध्याकाळी साडेसात वाजता महाआरती संपन्न होते. अशी माहिती पुजारी प्रसाद भुजबळ यांनी दिली. या निमित्ताने मंदिराची सजावट करण्यात येते व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. या मंदिराच्या मागच्या बाजूला प्राचीन चाफ्याचे झाड आहे. तसेच शमी आणि मंदार हे दोन दुर्मिळ वृक्ष आहेत.

बारा वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो, अशी आख्यायिका आहे. तर शमी वनस्पती गणेशाला अत्यंत प्रिय असल्याने या वृक्षाची पाने गणपतीला वाहण्यासाठी वापरतात. असे हे आगळे वेगळे बाप्पाचे रूप असल्याने येथे गणेश चतुर्थीच्या काळात भाविकांची गर्दी होते.