गणेशमूर्ती विसर्जनासाठीही ठिकठिकाणी “रांगा’!

धरणातून विसर्गामुळे नदीपात्रालगतचे काही हौद पाण्यात : होडीचीही सुविधा

पुणे – गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी पुणेकरांना रांगेत थांबण्याची वेळ आल्याचे शनिवारी दिसले. खडकवासला साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत सुमारे 18 हजार क्‍युसेक विसर्ग गुरूवारी रात्रीपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे डेक्कन, म्हात्रेपूल, विठ्ठलवाडी, नारायणपेठ परिसरातील विसर्जन हौद तसेच घाटांवर मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेकडून हे घाट बंद करण्यात आले होते. परिणामी, या घाटांच्या परिसरात नागरिकांना विसर्जनासाठी ताटकळत थांबावे लागले.

शुक्रवारी रात्री खडकवासला धरणातून सुमारे 18 हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठी विसर्जनाची सुविधा असलेले विठ्ठलवाडी, डेक्कन, गरवारे महाविद्यालय, दत्तवाडी, नारायण पेठ, ओंकारेश्‍वर मंदिर, तसेच वृद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरातील पालिकेचे विसर्जन हौद पाण्यात बुडाले. तसेच घाटांच्या परिसरात पाणी आल्याने नदीपात्रातला रस्ताही बंद करण्यात आला.

त्यामुळे नागरिकांना लोकमान्य टिळक पूल, पूलाची वाडी, कॉंग्रेस भवनासमोरील बाजू, गरवारे पुलावरच अडविण्यात आले. तसेच महापालिकेचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी या ठिकाणी उभे राहून नागरिकांच्या गणेशमूर्ती घेऊन नदीत विसर्जित करताना दिसून आले. मात्र, विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेकांना नागरिकांना रांगेत थांबून मूर्ती द्याव्या लागत होत्या. तर काहींनी बोटीतून नेत बाप्पांचे विसर्जन केले.

Leave a Comment