पेंटिंग काढण्यापेक्षा विकास करून नाव मिळवा

सातारा -साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा पूर्णपणे बालिशपणाचे लक्षण आहे. पेंटिंग त्रयस्थांनी काढले असते तर समजणे शक्‍य होते. पण त्यांच्याच बगलबच्चांनी त्यांचे पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. पेंटिंग काढण्यापेक्षा लोकांच्या सेवेची विकास कामे करून नाव मिळवा, असा जोरदार प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगवरून राजे समर्थक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये समज गैरसमजाचे निर्माण झालेले कवित्व अजूनही संपायला तयार नाही. राजे समर्थकांनी वाद मिटल्याचा दावा केला असला तरी त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपरोधक टोलेबाजी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “”नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवरायला हवे. प्रशासनावर त्यांची दैनंदिन कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे लागेल असे कोणतेही कृत्य होता कामा नये. खासदारांची पेंटिंग एखाद्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत काढले गेले असते तर ते समजू शकलो असतो.

मात्र, खासदाराच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांची पेंटिंग काढायचे आणि मी कसा लोकप्रिय आहे याचा त्यांनी स्वतःच उदो उदो करायचा हे न समजण्याच्या पलीकडे आहे. लोकप्रियता इतकी होती तर लोकसभेत का पराभव झाला याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. लोकांच्या विकास कामांना महत्त्व देणे अतिशय गरजेचे आहे.” लोकप्रिय कामे केली तर पेंटिंग काढले जाईल, असा टोला उदयनराजे यांनी लगावला होता. त्यावर “”असल्या पेंटिंगमध्ये मला रस नाही.

मला माझ्या मतदारसंघांमध्ये लोकांसाठी केलेल्या कामाची पूर्तता करणे यामध्ये रस आहे. या मतदारसंघातून बहुतांश वेळा मला प्रतिनिधित्व मिळाले आहे, ते आमच्या कामांमुळेच पेंटिंगचा हा प्रकार अत्यंत बालिशपणाचा आहे, अशी टीका शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली.