गुलाम नबींनी केली लोकसभा उमेदवाराची घोषणा

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमधील डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी उधमपूर- दोडा लोकसभा मतदार संघासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी येथून जी. एम. सरूरी यांना तिकिट दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रस पक्षाने डॉ. कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र भारतीय जनता पार्टीचे जितेंद्र सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.

जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवल्यानंतर त्या राज्यात प्रथमच लोकसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर विधानसभेची निवडणूकही त्याच वेळी घेतली जाऊ शकते. दरम्यानच्या काळात गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम करत आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. राज्यातील प्रत्येक जागेवर त्यांच्याकडून उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. त्याकरता राज्यात सर्वत्र जाहीर सभा घेण्याची तयारी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सुरू करण्यात आली आहे.

जम्मू काश्‍मीरच्या चिनाब परिसरातील तीन जिल्हे रामबन, दोडा आणि किश्‍तवाड येथे गुलाम नबी यांचा चांगला प्रभाव आहे. स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांना आपल्या पक्षात आणले आहे. जी. एम. सरूरी अगोदर कॉंग्रेसमध्येच होते. मात्र नंतर ते आझाद यांच्या पक्षात दाखल झाले. १९६७ पासून आतापर्यंत उधमपूर-दोडा मतदारसंघासाठी १२ वेळा निवडणूक झाली आहे. यातील चार वेळा ही जागा भाजपने जिंकली आहे तर तब्बल आठ वेळा येथे कॉंग्रेसचा विजय झाला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जितेंद्रसिंह यांनी कॉंग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा साडेतीन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. या मतदार संघात साक्षरतेचे प्रमाण जवळपास ६४ टक्के आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत. मात्र कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्‍मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच लडाख हाही एक वेगळा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्‍मीरमधील लोकसभेच्या जागांची संख्या ५ झाली आहे. लडाख हा अगोदर जम्मू काश्‍मीरचाच भाग होता. आता तेथील एका जागेसाठी वेगळी निवडणूक होईल.