सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या..! दहीहंडी पथकांची मागणी

मुंबई – दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी आता गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरु झाला आहे. बाळगोपाळांच्या उत्सुकतेत ढाकुम्माकुमचा आवाज आतापासूनच सर्वांच्या कानात घुमू लागला आहे. दहीहंडी हा मुंबईतील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यात गोविंदा पथकांचे मनोरे आणि सेलिब्रिटींची मांदियाळी असे हे समीकरण आहे.

दरम्यान, यंदाच्या दहीहंडीपूर्वी “सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या,’ अशी मागणी दहीहंडी पथकांकडून होत आहे. यासह दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना असावी, दहीहंडीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणीही, या गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे.

घाटकोपरचे क्रांती गोविंदा पथक हे आठ आणि नऊ थर लावण्यासाठी आणि अनोख्या संकल्पना करण्यास प्रसिद्ध आहे. फिरते थर, डोळे बंद करून थर लावणे, शिवाजी महाराज यांचे पराक्रम सांगणारे थर, देशभक्तीपर थर, वारकरी संप्रदाय दाखवणारे थर अशा अनेक हटके संकल्पना या पथकाने आतापर्यंत केल्या आहेत.

यंदा देखील हे पथक आठ थरांची तयारी करीत आहे. दहीहंडीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत करावी आणि जास्तीत जास्त आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव ठेवावा अशी मागणी या गोविंदा पथकाने केली आहे.

सार्वजनिक सुट्टी जाहीर करा.!

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन याआधी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्र्यांची “देवगिरी’ येथे भेट घेऊन निवेदन दिले होते.