“पुद्दुचेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ” या बड्या नेत्याने केली घोषणा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास पुद्दुचेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल अशी ग्वाही द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिली आहे.

पुद्दुचेरी येथील काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार व्ही वैथिलिंगम यांना पाठिंबा देण्यासाठी येथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की पुद्दुचेरीला पूर्ण राज्य बनवायला हवे यावर द्रमुक आणि काँग्रेस ठाम आहेत. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी हे केंद्राच्या हातातील कठपुतळी आहेत,असा आरोपही त्यांनी केला.

स्टॅलिन म्हणाले केवळ तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्यांचेच नव्हे, तर पुद्दुचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकारांचेही संरक्षण व्हावे यासाठी आम्ही उत्सुक आहोत. केंद्रातील भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात पुद्दुचेरीला काहीही फायदा झाला नाही, असे सांगून तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ धर्म आणि जातीच्या नावावर प्रचार करत आहेत.

केंद्रशासित प्रदेश “सर्वोत्तम पुद्दुचेरी” बनविण्याचे मोदींनी यापूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी काहीही केले नाही, असे ते म्हणाले.या मतदार संघात १९ एप्रिलला मतदान हेाणार आहे.