सांगली द्या अन् उत्तर मुंबई घ्या… काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांवर मनधरणीची जबाबदारी

Lok Sabha Election 2024 – सांगली लोकसभा मतदार संघातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेने सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी व त्या मोबदल्यात उत्तर मुंबईची जागा घ्यावी, असा हा प्रस्ताव आहे.

पण या प्रस्तावाला उद्धव ठाकरे व त्यांचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीचा जागा ठाकरे गटाला सुटली आहे. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना स्थानिक नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचीही साथ मिळाली आहे.

यामुळे मतविभाजनाची स्थिती उत्पन्न झाल्याने काँग्रेस नेतृत्व बेजार झाले आहे. परिणामी, या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने ठाकरे गटापुढे जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यापुढे सांगलीच्या मोबदल्यात उत्तर मुंबईची जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला ठाकरे व त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.

चंद्रहार पाटलांनी आपली उमेदवारी मागे घेतली तर काँग्रेस त्यांना विधान परिषदेवर पाठवेल. त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्रस्ताव आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.

काँग्रेसने यावेळी सांगलीत पक्षाला अनुकूल वातावरण असल्याचाही दावा केला. गत लोकसभा निवडणुकीत वंचितने घेतलेल्या मतांमुळे विशाल पाटील पराभूत झाले होते. पण आता तिथे वंचितची फारशी ताकद राहिली नाही.

ठाकरेंच्या शिवसेनेचीही तिथे फारशी ताकद नाही. याऊल तिथे काँग्रेसचे वर्चस्व असल्यामुळे ही जागा आम्हाला मिळू शकते. ठाकरे व चंद्रहार पाटलांनी हे वास्तव लक्षात घेऊन काँग्रेसचा प्रस्ताव स्विकारावा. असे झाले तर सांगलीत मोठ्या फरकाने भाजपचा पराभव होईल, असेही हा नेता या प्रकरणी बोलताना म्हणाला.