अडीच कोटी द्या, ईव्‍हीएम हॅक करतो.! भारतीय जवानाची थेट दानवेंना ऑफर; नेमकं प्रकरण काय?

EVM Hacked | Indian soldier | Ambadas Danve – देशात लोकसभा निवणूकीसाठी मंगळवारी राज्‍यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान ईव्‍हीएममध्ये फेरफार करण्यासाठी सैन्यातील एका जवानाने थेट विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्‍ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव मारुती ढाकणे असून तो जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलात कार्यरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील तो मूळचा रहिवासी आहे. 42 वर्षीय आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांच्याकडे पैशांची मागणी केली. फेरफार करून मतं वाढवून देईन, असा दावाही आरोपीने केला. याप्रकरणी दानवे यांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली.

या आरोपीने मंगळवारी (7 मे) सायंकाळी 4 च्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे लहान भाऊ राजेंद्र दानवे यांची छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्यात डीलविषयी चर्चा झाली. आरोपीने केलेली अडीच कोटींची मागणी वाटाघाटीनंतर दीड कोटी रुपयांवर येऊन चर्चा थांबली. यावेळी आरोपीला राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन मनी म्हणून एक लाख रुपये घेताना रंगेहात पोलिसांनी पकडले.

कर्ज फेडण्यासाठी वापरली ही युक्ती
या प्रकरणी पोलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, ‘आरोपीवर खूप कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने ही युक्ती वापरली. त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही.

आम्ही त्याला अटक केली असून, क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीविरुद्ध IPC च्या कलम 420 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.