पुणे | मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला जीवदान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या सहाव्या महिन्यांत जन्मलेल्या बाळाला पेंटंट डक्टस आर्टिरिआॅसस (पीडीए) (ह्वदयविकार) चा त्रास असल्याचे दिसून आले. त्यावर डाॅक्टरांच्या टीमने तात्काळ पिकोलो डिव्हाईस क्लोजर प्रक्रिया करून बाळाला जीवनदान दिले. पुण्यातील ही पहिलीची घटना असून, २३ आठवड्यांचे मुदतपूर्व जन्मलेले बाळ वाचणे हे देखील एक दुर्मिळ यश आहे, असे केईएममधील बहुविभागीय टीमने इंटरव्हेंशनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. पंकज सुगावकर आणि वरिष्ठ नवजात तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी सांगितले.

डॉ. तुषार पारीख म्हणाले, हे बाळ जन्माच्या वेळेस अत्यंत गंभीर परिस्थितीत होते. अशा बाळांसाठी एनआयसीयूची प्रक्रिया म्हणून फंक्शनल इको कार्डिओग्राफी (बाळाच्या हृदयाचे आरोग्य) च्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात या बाळाला पेटंट डक्टस आर्टिरिआॅसस (पीडीए) ही स्थिती असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. पंकज सुगावकर म्हणाले, या विकारामध्ये औषधाने छिद्र बंद करण्याचा उपयोग होत नसल्याने शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता.

पिकोलो डिव्हाईस तंत्र येण्याआधी पाठीच्या बाजूने बरगड्यांममध्ये छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जायची. मात्र, या बाळाची परिस्थिती अतिशय गंभीर व गुंतागुंतीची होती. त्यामुळे अभिनव अशी पिकोलो डिव्हाईस प्रक्रिया ही वरदान व जीव वाचविणारी ठरू शकते. दरम्यान, हे बाळ आता १० महिन्यांचे झाले असून, त्याचे आरोग्य चांगले आहे.

काय आहे पीडीए?
पीडीए हा जन्मजात हृदयविकार असून, यामध्ये 2 प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये सतत एक छिद्र असते. या छिद्राला डक्टस आर्टेरिऑसस असे म्हणतात. आईच्या पोटात असताना, बाळाला रक्तप्रवाह करणार्‍या हा गर्भाशयातील प्रणालीचा एक भाग आहे. हे छिद्र सहसा जन्मानंतर लवकर बंद होते. जर ते उघडे राहिले, तर त्या स्थितीला पेटंट डक्टस आर्टिरिऑसस असे म्हणतात. छिद्र मोठे असल्यास व उपचार न केल्यास अनेक गुंतागुंत निर्माण होतात.