ज्ञानभारती शाळेची इमारत जमीनदोस्त

शिक्षकांना अश्रू अनावर

सातारा – कृष्णानगर आणि प्रतापसिंह नगर येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा ठरलेली ज्ञानभारती सामाजिक सेवा संस्थेच्या ज्ञानभारती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची इमारत बुधवारी जेसीबीने पाडण्यात आली. जलसंपदा विभागाच्या जागेत करार तत्वावर गेल्या अठरा वर्षापासून सुरू असलेल्या या शाळेची इमारत मेडिकल कॉलेजच्या कामासाठी पाडण्यात आल्याने येथे जूनपासून सुरु होणारे 450 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अडचणीत येणार आहे.

कृष्णानगर आणि प्रतापसिंह नगर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या अठरा वर्षापासून ज्ञानभारती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वरदान ठरली आहे. या शाळेची इमारत जलसंपदा विभागाच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर उभी होती. मात्र मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाल्यानंतर या शाळेच्या इमारतीवर गदा येणार हे स्पष्ट झाले होते. मात्र आमदार महेश शिंदे यांनी मध्यस्थी करून या शाळेला अभय दिले होते. तरीही बुधवारी मेडिकल कॉलेजच्या ठेकेदाराने जेसीबीने शाळेची इमारत जमिनदोस्त केली.

तत्पूर्वी शाळेच्या शिक्षकांनी सर्व साहित्य तात्काळ हलवले. जागा खाली करण्यासंदर्भात शाळेला यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सर्व काही नियमानुसार असल्याचे सांगण्यात आले असले तरी 15 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्यामुळे ही शाळा आता कोठे भरवायची हा प्रश्‍न येथील शिक्षकांना प्रश्‍न आहे. या संदर्भात बोलताना शाळेच्या संचालिका कारखानीस मॅडम म्हणाल्या, “जिल्हाधिकाऱ्यांना किमान 15 गुंठे जागा मिळावी असे पत्र आम्ही दिले आहे. याच परिसरात ही जागा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. या शाळेचे साडेचारशे विद्यार्थी असून सध्या येथे वीस शिक्षक कार्यरत आहेत. दीड एकर परिसरामध्ये शाळेचा विस्तार होता. शाळेची इमारत पाडली गेल्यामुळे शिक्षकांना अश्रू अनावर झाले होते.