Good News: भारतात कोरोनाच्या पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरु

पटना: भारतासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील देश कोरोनाला रोखण्यासाठी लस बनवत आहेत. एक आनंदाची बातमी म्हणजे, भारतात कोरोनाच्या पहिल्या लसीची मानवी चाचणी सुरु झाली आहे. आज १० जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

पटन्याच्या एम्समध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे मानवावर प्रयोग सुरु आहेत. ही लस भारत बायोटेक या हैदराबाद येथील कंपनीने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता.

ऑल इंडिया रेडिओने दिलेल्या माहितीनुसार, पटना एम्स मध्ये हॉस्पिटलने निवडलेल्या १० जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पहिला डोस देण्यात आला असून १४ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी १२ संस्था निवडल्या आहेत. त्यापैकी  पटनाचे एम्स एक आहे.

कोव्हॉक्सिन लस कोव्हीड १९ विषाणूविरोधात परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक कंपनी २०० दशलक्ष लसी बनवण्याच्या तयारीला लागली आहे. ही लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे.

– डॉ. कृष्णा इल्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भारत बायोटेक 

 

Leave a Comment