Aditya Thackeray : “शासकीय रुग्णालये मृत्यूचा सापळा बनली?’; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल !

Aditya Thackeray – नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तब्बल 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मंगळवारी घडला असून 2 बालकांसह 16 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. “महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचे ढळढळीतपणे दिसते आहे.

लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही अशांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ट्विट करत आदित्य ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचे समोर येत आहे.

2 बालकांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून 7 मृत्यू झाल्याचे समजते आहे. हे सगळे भयानक आहे. त्यामुळे, शासकीय रुग्णालये ही मृत्यूचा सापळा बनलीय का? अशी शंका येतेय, असेही आदित्य यांनी म्हटले आहे.