“अयोध्येला जाणाऱ्या लोकांना सरकारने कडक सुरक्षा दिली पाहिजे, अन्यथा..” कॉंग्रेस नेत्याने व्यक्त शंका

नवी दिल्ली – अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक राजकीय कार्यक्रम असल्याची टीका करतानाच अयोध्येत गोध्रा कांडसारखी घटना होण्याची शंकाही कॉंग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

हरिप्रसाद म्हणाले की राम मंदिराचे उदघाटन हा काही धार्मिक कार्यक्रम नाही तर तो एक राजकीय कार्यक्रम आहे. तो धार्मिक कार्यक्रम असता तर आम्ही लोकही त्यात सहभागी झालो असतो. धार्मिक कार्यक्रम असता तर गुरू मंडळीही त्यात सहभागी झाली असती. मात्र या सोहळ्यात केवळ राजकारण आहे कारण पंतप्रधान त्याचे उदघाटन करणार आहेत.

शंकराचार्य, त्यांचे अनुयायी आणि इतर धार्मिक गुरू सहभागी होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमित शहा कोण आहेत? तो कोणी धार्मिक गुरू आहेत का असा सवालही हरिप्रसाद यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले अयोध्येला जाणाऱ्या लोकांना सरकारने कडक सुरक्षा दिली पाहिजे. अन्यथा गोध्रासारखी घटना होऊ शकते कारण गोध्रात असाच प्रकार घडला होता. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते पुढे म्हणाले की लोकांच्या जीविताचे आणि साधन संपत्तीचे रक्षण करणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा इतिहास पाहिला तर तुम्हाला गोध्रा, पुलवामासारख्या घटना दिसून येतात.