आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणांचे सरकारचे लक्ष्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्‍मीरमधील जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आज आयुष्मान भारत योजनेचे विस्तारीत स्वरूप, पंतप्रधान “जे ए वाय सेहत’ या योजनेचा दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रारंभ केला.

जिल्हा पंचायतीच्या निवडणुका नंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये नव्या युगाचा आरंभ झाला आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जम्मू-काश्‍मीरमधील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका शांततेत आणि सुरक्षित पार पडल्या याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

जम्मू-काश्‍मीरचा विकास ही सरकारची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलिकडेच देशात लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंचायतीच्या निवडणूका हे लोकशाहीचेच निदर्शक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा घडवणे हे देशाचे लक्ष्य आहे. महिला सुरक्षा, आरोग्य, शोषित वंचितांचा अधिकार आणि सर्वांसाठी मूलभूत सुविधा पुरवणे सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे असे पंतप्रधान म्हणाले.

15 लाख अतिरिक्त कुटुंबांना याचा लाभ होणार असून, गंभीर आजारांवरील उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेत समावेश असलेल्या देशभरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहेत.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमातून दूरदृश्‍य प्रणालीच्या सहाय्याने गोल्डन कार्ड लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. पंतप्रधानांच्या वतीने प्रियंका संधू, रोहित कुमार, राणी देवी, मोहम्मद बाबर या लाभार्थ्यांना ई कार्ड वितरित करण्यात आली.या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे गरिबांसाठी आणखी काम करण्याचा उत्साह निर्माण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. या योजनेबद्दल लाभार्थ्यांनी सर्वांना माहिती द्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच मोफत मिळेल, ही आरोग्य क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात आहे असे गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले. करोना संकट काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये योग्य व्यवस्थापन केल्याबद्दल जम्मू-काश्‍मीर सरकारचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर येत्या वर्षभरात मोठे काम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी सांगितले.

Leave a Comment