जीपीएस रिडिंग फक्‍त 30 सेंकदांत

“कॉर्स’च्या आधारे होणार अचूक जमीन मोजणी

पुणे – जमीन मोजणीसाठी निरनिराळ्या साधनांचा वापर केला जातो. जीपीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे.

संबंधित जागेवर जीपीएस रिडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रिडिंग घेण्यासाठी किमान 1 ते 4 तास लागतात. जीपीएस रिडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स (कन्यटिनिव्ह ऑपरेशन रिडिंग स्टेशन) या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. कॉर्स आधारे जीपीएस रिडींग फक्‍त 30 सेंकदात घेता येणार आहे. यामुळे गावठाणाच्या हद्दीचे भूमापन इतर जमीन मोजणी अधिक लवकर करणे शक्‍य होणार आहे. या कॉर्स वर जीपीएस घेण्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली
आहे.

फक्‍त अर्धा मिनिटात अचूक रिडिंग
कॉर्स हे जीपीएस रिडिंग घेण्यासाठी भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आहे. याद्वारे जीपीएस रिडिंग घेण्यासाठी केवळ 30 सेकंद लागतात. यासाठी केवळ इंटरनेटची आवश्‍यकता आहे. इंटरनेट उपलब्ध असेल तर अचूक रिडिंग फक्‍त अर्धा मिनिटात मिळणार आहे. याची चाचणी नुकतीच जिल्ह्यात घेण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग गावठाण मोजणीबरोबरच जमीन मोजणीला होणार आहे. त्याचबरोबर सर्वे ऑफ इंडिया सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक 70 ते 80 किलोमीटर अंतरावर जीपीएस स्टेशन स्थापन करणार असल्याचे भूमी अभिलेख विभाग पुणे विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.

त्यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्कलिंगम, सीईओ उदय जाधव, नागरी भूमापन उपसंचालक बाळासाहेब काळे उपस्थित होते.

Leave a Comment