Grampanchayat Election : ग्रामपंचायतीत भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष; अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, तर शिंदे गटाने….

Grampanchayat Election – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्यातील निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर अजित पवारांनीही चांगलीच मुसंडी मारली आहे. भाजपनंतर अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे.

राज्यात रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कौल आज समोर आले आहेत. यामध्ये अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीने सरशी केली तर महाविकास आघाडीची पिछेहाट झाली.

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर गावकऱ्यांना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांचा कारभारी मिळाला. यामध्ये 600 पेक्षा अधिक जागा मिळवून भाजपने अव्वल क्रमांक पटकवला.

त्यामागे अजित पवार गटाने नंबर लावला. 350 पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे बारामतीचा गडही अजित पवारांनी राखल्याचे चित्र आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने 250 पेक्षा जास्त जागांवर त्यांचा उमेदवार निवडून आणला.

कॉंग्रेस पक्षाने आतापर्यंत 598 ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे, तर 132 ग्रामपंचायतीत कॉंग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण 721 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीने एकूण 1312 ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे.

ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मतदारांनी त्यांचा कौल दिलाय. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानतो. मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामे ही महायुतीच्या सरकारने पूर्ण केली.

या प्रकल्पांना चालना देऊन आम्ही राज्याचा सर्वांगिण विकासाचे काम केले. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहचले आहे. हे सर्व मतदारांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. पण “खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत.

नागपूरमध्ये भाजपचा सुपडासाफ झालेला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यात कॉंग्रेसने दणदणित विजय मिळवला आहे.
– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष