20 वर्षाच्या तरूणीचा फोटो दाखवून 45 वर्षीय महिलेला उभं केलं मंडपात; नवरदेवानं गाठलं पोलिस स्टेशन

लखनऊ – इटावामध्ये एका युवकाला 20 वर्षीय तरूणीचा फोटो दाखवून प्रत्यक्ष लग्नात मात्र 45 वर्षीय महिला उभी केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर तरूणाने नवरदेवाच्या वेशात आपल्या आईसोबत पोलिस ठाणे गाठत आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले.

विजयपुरा येथील शत्रुघ्न सिंहचे लग्न शहरातील मोहल्ल्यातील एका तरूणीसोबत ठरले होते. शत्रुघ्नने सांगितले की, 19 ऑगस्ट रोजी लालपुरा येथील नीलकंठ मंदिरात त्याला मुलगी दाखवली होती. तेव्हा त्याला मुलगी पसंद झाली. शुक्रवारी विजयपुरा येथील काली माता मंदिरात लग्न लावण्याचे ठरवले होते. संध्याकाळी तो परिवारासह मंदिरात पोहोचला. त्याला आधी जी मुलगी दाखवली होती त्याजागी 45 वर्षीय महिलेला लग्नासाठी मंडपात उभे करण्यात आले.

हे पाहताच त्याने महिलेसोबत लग्न करण्यास मनाई केली. त्यावेळी मुलीकडील मंडळींना नवरदेवाला मारहाण केली. त्यानंतर शत्रुघ्न आपल्या आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचला आणि सर्व हकिगत सांगितली. तसेच गावातील दलालांनी लग्न जमवून देण्यासाठी त्याच्याकडून 35 हजार रुपये घेतल्याचेही सांगितेल. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून पुढील कारवाई सुरु आहे.