ग्राऊंड रिपोर्ट : ताबारेषेवर शांतता मात्र दीर्घकाळ वास्तव्यासाठी लष्कर सज्ज

विशेष प्रतिनिधी – प्रत्यक्ष ताबा रेषेवरून (लडाख) – भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्को येथे झालेल्या सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता आहे. चीनकडून गेल्या पाच सहा दिवसांत आक्रमणाचा कोणताही प्रयत्न झाला नाही. मात्र, येथील बोचऱ्या हिवाळ्यात दीर्घकाळ वास्तव्याची तयारी लष्कर करत आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग वी यांच्यात चर्चा होऊन गुरूवारी आठवडा उलटेल. त्या भेटीनंतर दोन्ही देशांनी शांततेसाठी पंचसूत्री जाहीर केली होती. त्यात सीमेवरून तातडीने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या सोमवारी या मंत्र्याच्या भेटीआधी प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनने गोळीबारही केला होता. त्यानंतर मंगळवारीही चीनने प्रक्षोभक कारवाया केल्या होत्या. दरम्यान, येणाऱ्या हिवाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दीर्घकाळ या भागात तळ ठोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनांसाठी लागणाऱ्या विशेष इंधन आणि वंगणाचा साठा करण्यात आला आहे. त्यात त्याच्या देखभालीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचाही समावेश आहे.

पाण्यासाठी सोय आणि कुपनलीका बनवण्यात आली आहे. त्यांचा वापर जवान आणि याक सारख्या पाळीव जनावरांसाठी करण्यात येईल. ते रहात असलेल्या बराकी या आरामदायी आणि गरम ठेवण्यात येतील. काही केंद्रावर सेंट्रल हिटिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे.

लहान शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि रणगाडे यांचीही पुरेशी सोय केली आहे. कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास त्यासाठी पुरेशी वैद्यकीय सोय करण्यात आली आहे. भारतीय जवानांना अशा स्थितीत सियाचेनमध्ये राहण्याचा अनुभव आहे. तेथील स्थिती यापेक्षा भयानक असते. प्रत्यक्ष ताबारेषेवरून चीनने सैन्य अद्याप मागे घेतले नसल्याने “हिवाळी युध्दा’ची तयारी भारतीय लष्कराने केली आहे. 

मेजर जनरल अरविंद कपूर यांनी लडाखमध्ये पत्रकारांना याची माहिती दिली. ते म्हणाले, आमच्याकडे पुरेशी उपकरणे, जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. उच्च दर्जाचे आणि उत्तम पोषण मुल्ये असणारे अन्न यांचा समावेश आहे.

ज्या भागात सैन्य ठोकून असेल तेथे नोव्हेंबर महिन्यात 40 फूट बर्फ जमा होते. तापमान उणे 30 ते 40 अंशाच्या घरात असते. अत्यंत बोचरी थंड हवा तेथील वास्तव्य अधिक दुष्कर बनवते.

Leave a Comment