अंधांकडे “डोळेझाक’! गाइड पासची सवलत रद्द : 50 टक्के तिकीट भरावे लागणार

पुणे : अंध व्यक्तींना शहरात प्रवास करताना सोबत मदतनीसाला (गाइड) पीएमपीचे मोफत तिकीट दिले जात होते. मात्र, आता ही रक्कम गाइडसाठी 50 टक्के करण्यात आली आहे. याशिवाय पूर्ण वर्षभरासाठी एकच गाइड सोबत ठेवण्याचे बंधनकारक केले आहे. परिणामी, शेकडो अंध व्यक्तींना या आडमुठेपणाचा फटका बसत आहे. हा निर्णय मागे घ्यावा, पूर्वीप्रमाणेच गाइडलाही मोफत बसपास द्यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, सोमवारी या मागणीसाठी अंध व्यक्तींच्या वतीने महापालिका प्रशासनास पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले.

अंध व्यक्तींना प्रवासासाठी पीएमपी बसचा वापर करावा लागतो. मात्र, त्यावेळी रस्ता सुरक्षित ओलांडून जाण्यासह, थांब्यावर जाणे, बस मध्ये चढणे तसेच निश्‍चित स्थळी जायीपर्यंत त्यांना गाइड मदत करतो. हा गाइड अंध व्यक्तीचे आपत्य किंवा इतर एखादा नातेवाईक, मित्र अथवा समाज सेवक असू शकतो. त्यामुळे पीएमपीमध्ये अंध-दिव्यांगांसोबत असलेल्या व्यक्तीला पीएमपीचा प्रवास मोफत होता. तसेच त्याचे पैसे समाज विकास विभाग देत होता.

मात्र, मागील वर्षांपासून महापालिकेने गाइडसाठी ओळखपत्र बंधनकारक केले आहे. तसेच ओळखपत्र असलेल्या व्यक्तीला पीएमपी प्रवासाच्या तिकिटाच्या 50 टक्के रक्कम देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता अंध व्यक्तीला कायमस्वरुपी एकच गाइडसोबत ठेवता येतो.

अनेकदा आयत्या वेळेस हा ओळखपत्र असलेला गाइड नसल्यास अंधांना पीएमपी प्रवास करणे जिकरीचे होते. आयत्यावेळी सोबत घेतलेल्या गाइडच्या तिकिटाचा खर्च अंध व्यक्‍तींना उचलावा लागतो. खर्च दिला न गेल्यास अनेक जण सोबत येण्यास तयार होत नाही, ही वस्तूस्थिती आहे.

अंध व्यक्तींसाठी गाइड महत्वाचा आहे. मात्र, महापालिकेने त्यांच्या प्रवास पासवरच मर्यादा आणल्याने अंध व्यक्‍तींची कोंडी झाली आहे. नव्या नियमांमुळे अंध व्यक्‍तींसोबत येण्यास कोणीही तयार होत नाहीत. प्रत्येकवेळी एकच व्यक्ती सोबत असेल, असे होत नाही. याबाबत आम्ही गेली वर्षभर विनंती, आंदोलनेही करत आहोत. मात्र, मनपा प्रशासन आमच्या प्रश्‍नाकडे “डोळस’पणे बघण्यास तयार नाही.
– अनिल खुराणा