खासगी सावकाराच्या घरात बंदुका आणि काडतुसे सापडली

सातारा (प्रतिनिधी) – खिंडवाडी, ता. सातारा येथील ज्ञानदेव आनंदराव गोडसे या खासगी सावकाराच्या घरात एक रायफल, एक पिस्तूल व बारा बोअरच्या बंदुकीची दोन जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, ज्ञानदेव गोडसेने व्याजाच्या पैशांसाठी एकाचे अपहरण व मारहाण केल्याची घटना सातारा तालुक्‍यातील करंडी येथे घडली होती. या प्रकरणी दीपक सुभानराव जाधव (रा. करंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपहरण व खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. जाधव यांनी घेतलेल्या दहा लाख 40 हजार रुपये कर्जापोटी गोडसे याने व्याज व मुद्दल मिळून 31 लाख 20 हजार रुपये वसूल केले होते. त्यानंतरही गोडसे पैशाची मागणी करत होता. त्याला जाधव यांनी नकार दिल्याने गोडसे याने दि. 5 जूनला जाधव यांना त्यांच्या घरातून उचलून जबरदस्तीने आपल्या गाडीतून सातारा एमआयडीसीत नेले होते. तेथे जाधव यांना मारहाण आणि त्यांची आई व भाऊ यांना पैशासाठी फोनवरून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले होते.

सातारा तालुका पोलिसांनी गोडसेला अटक करून काल (दि. 27) त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी एक रायफल, एक पिस्तूल व बारा बोअर बंदुकीची दोन जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. त्याचा परवाना गोडसेकडे नसल्याचे स्पष्ट झाले. आता त्याच्यावर खासगी सावकारीबरोबर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सक्षम अधिकाऱ्याकडे तपास देण्याची गरज
गोडसे हा सातारा परिसरातील नामचीन खासगी सावकार असल्याचे समजते. त्याने अनेकांना कर्जाच्या पैशासाठी छळल्याची शक्‍यता आहे. त्याच्या घरात घातक शस्त्रे सापडल्याने या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment