जिम, फिटनेस सेंटर्सनाही जबर फटका

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान : मदतीची मागणी


जागाभाडे, वीजबिल, बॅंकेचे कर्ज थकले

पुणे – “करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडऊनमध्ये सरकारने जिम आनि फिटनेस सेंटरवर बंदी घातली होती. त्यामुळे जिम आणि फिटनेस सेंटर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे भाडे, वीजबिल, बॅंकेचे कर्ज यामुळे अनेक व्यावसायिकांची आर्थिक स्थिती खालावाली आहे. अशा व्यावसायिकांच्या पुनरूज्जीवनासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी,’ अशी मागणी महाराष्ट्र फिटनेस ऍन्ड जिम असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

करोनामुळे जिम आणि फिटनेस व्यवसायिकांची अवस्थाही बिकट आहे. गेले तीन महिने बंद असलेल्या जिममुळे व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन प्रभावित झाले आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिकांना मदत म्हणून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी.

तसेच जिम व्यावसायिक, कर्मचारी यांना रेशन उपलब्ध करून द्यावे. करोना विषाणूवरील लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कमी व्याजदरामध्ये विनातारण कर्ज आणि कोणत्याही प्रकारच्या करामध्ये 30 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वरे दिली. यावर तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment