मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डुलक्या घेणे पडले महागात; व्हिडीओ व्हायरल होताच तासाभरात मुख्य अधिकारी निलंबित

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्यक्रमात डुलकी घेणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. कार्यक्रमादरम्यान झोप घेतल्याबद्दल भुज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण विभागाचे उपसचिव मनीष शहा यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला आहे. गुजरात नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७१ च्या नियम ५(१)(अ) अन्वये भुज नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिगर पटेल यांना गंभीर निष्काळजीपणा आणि कर्तव्यात निष्ठा न बाळगल्याबद्दल निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. .

भुज शहरातील टाऊन हॉलमध्ये शनिवारी भूकंपग्रस्तांना पुनर्वसनासाठी घराची कागदपत्रे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. कागदपत्र वितरणानंतर सीएम पटेल जनतेला संबोधित करत होते. दरम्यान, भुज नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिगर पटेल यांना डुलकी लागली. यानंतर काही वेळातच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.