100 अतिक्रमणांवर हातोडा! आम्ही राजगुरूनगरच्या पाठपुराव्याला यश : गर्भश्रीमंतांना कारवाईतून वगळले

राजगुरूनगर – राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर पथारीधारकांची 100 अतिक्रमणे आम्ही राजगुरूनगरकरच्या आंदोलनामुळे गुरुवारी रात्री नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांत, तहसीलदार आणि पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईतून हटवली. यामध्ये गरिबांवर कारवाई आणि श्रीमंतांना अभय दाखविण्यात आले. ज्यांनी रस्त्यावर पक्‍की बांधकामे केली. त्याबाबत आम्ही राजगुरूनगरकर काय भूमिका घेणार की श्रीमंतांना अभय देणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वाडा रस्त्यावर गुरुवारी (दि.22) सप्टेंबर रोजी ट्रॅक्‍टरचा धक्‍का दुचाकीला बसल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला ही सहा महिन्याच्या मुलीसह खाली पडली. ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे जोरदार पडसाद शहरात उमटले. “आम्ही राजगुरूनगरकर’ या बॅनरखाली नागरिकांनी (दि.25) उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला. आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु केली.

शिरूर- राजगुरूनगर- भीमाशंकर या नव्याने राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झालेल्या रस्त्यावर राजगुरूनगर शहरात वाडा रस्त्यावर दुकानांसमोर, सरकारी कार्यालयांपुढे अनधिकृत वाहन पार्किंग होत होती. धनश्री चौक ते पंचायत समितीपर्यंत मोठ्या दुकानदारांनी रस्त्यात मोठ्या इमारती बांधून पार्किंगला जागा न सोडता अतिक्रमणे केली आहेत. महात्मा गांधी विद्यालयाजवळ पथारीधारकांचे अतिक्रमण होते. त्यामुळे राजगुरूनगरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

वाहतूक कोंडीविरोधात राजगुरूनगरकर आक्रमक झाले. आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, बांधकाम विभाग, पोलीस स्टेशन आदी प्रमुख अधिकाऱ्यांना आम्ही राजगुरुनगरकरच्या कार्यकर्त्यांनी निवेदने दिली. त्यानंतर गुरुवारी (दि.29) रात्री पथारीधारकांवर प्रशासनाने धडक कारवाई केली. 100 ते 150 पथारीधारकांवर कारवाई झाली. मात्र, शहरातील रस्त्यावर केलेली बड्या व्यावसायिकांवर नेहमीप्रमाणे कारवाई टाळली आहे.

गुरुवारी रात्री प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, मुख्याधिकरी निवेदिता घार्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनराज दराडे, नायब तहसीलदार संजय शिंदे, मदन जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, मंडलाधिकारी सविता घुमटकर आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई झाली. “आम्ही राजगुरूनगरकर ‘चे अमर टाटीया, नितीन सैद, सागर सातकर, बापू नगरकर, राजन जांभळे, दिनेश कड, वैभव घुमटकर, राहुल आढारी, ऍड. दत्तात्रेय सांडभोर, अमित घुमटकर, प्रशांत कर्नावट, निर्णय पवार, दिलीप होले, युवावर्गाने प्रशासनाला कारवाईत सहकार्य केले.

दोनशे पथारीधारकांचे संसार उघड्यावर

शहरात नेहमीच होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमुळे दोनशे पथारीधारकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. पाच वर्षांत त्यांच्यावर जवळपास आठ ते दहा वेळा कारवाई झाली आहे. याविरोधात बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले होते. याबरोबरच अनेक मोठी आंदोलने करूनही प्रशासनाने पथारीधारकांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून पथारी धारकांचे पुनर्वसनाचा प्रश्‍न कायमच दुर्लक्षित राहिला आहे. अतिक्रमण कारवाई होते तेंव्हा अधिकारी केवळ पथारीधारकांना लक्ष करीत आहेत. मात्र, मोठ्या व्यवसायिकांची अतिक्रमणे, पार्किंगकडे प्रशासनाने लक्ष देत नाहीत. सर्वांना समान न्याय मिळावा अशी मागणी आहे