सव्वातीन लाख कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’; दिवाळीनिमित्त जिल्ह्यात वाटप सुरू

पुणे – राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, पुरवठा निरीक्षक कृष्णा जाधवर यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार आदी उपस्थित होते.

कोणाला मिळणार लाभ?

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान, यंदा 3 लाख 23 हजार 456 शिधा संचांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत वाटप होणार आहे.

असा आहे ‘आनंदाचा शिधा’

प्रत्येकी एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असे आनंदाचा शिधाचे स्वरुप आहे.