Happy New Year : फटाक्यांची आतषबाजी करत भारतासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

Happy New Year : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. भारतासह जगभरात नवीन वर्षाचे उत्साहात आणि नव्या उमेदीने स्वागत करण्यात आले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, चीन आणि मंगोलियापाठोपाठ भारतातही  अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करत २०२४ चे स्वागत करण्यात आले.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी एकत्र येत नवीन वर्षाचे स्वागत केले.  दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस, गोव्यातलया अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक आणि नागरिकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी तुडुंब गर्दी केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५० सेकंद झाल्यावर लोकांनी सेकंद मोजायला सुरुवात केली आणि ठीक १२ वाजता एकच जल्लोष करत या नवीन वर्षाचे स्वागत केले.

दरम्यान, सात तासांपूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातल्या नागरिकांनी नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत केले. न्यूझीलंडमधील पूर्वेकडील प्रसिद्ध शहर ऑकलंडमधील लोकांनी सर्वात आधी नववर्षाचा जल्लोष केला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात आतषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर पूलावर मोठी आतषबाजी करण्यात आली. याठिकाणी भव्यदिव्य लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते.

ओशनिया खंड ज्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यासारखे बेटांचे देश आहेत येथे नवीन वर्षाचे प्रथम स्वागत केले जाते. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हे नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. येथे १ जानेवारी सुरु झालं तेव्हा भारतात ३१ डिसेंबरच्या दुपारी ३.३० वाजले होते. टोंगा, सामोआ आणि किरिबाटी यांनी प्रथम नवीन वर्षाचे स्वागत केले, त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.