जनतेला पाणी मिळते याचा आनंद – आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर – अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. काम कोणी केले हे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जनतेला माहीत आहे. सरकार बदलले आणि नशिबाने त्यांना कालव्यांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. हे धरण व कालव्यांसाठी केलेले कष्ट मोठे असून या कष्टानंतर दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे. याचा आपल्याला आनंद आहे. दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल, तो आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीचा दिवस असेल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याच्या चाचणीनंतर ते म्हणाले की, हा माझ्यासह सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे. 1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबवून प्रकल्पग्रस्तांना संगमनेर तालुक्‍यात चांगल्या जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या नोकऱ्या दिल्या.काम तातडीने होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन भिंतीचे काम पूर्ण केले. याचवेळी मोठमोठ्या बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्णत्वास आणली.

मात्र 2014 ते 2019 या काळात कामे थंडावली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येतात मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. कोरोना महामारीतही हे काम अविरतपणे सुरू होते. ऑक्‍टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे आपले स्वप्न होते. आपण काम केले पण कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही. काम अंतिम टप्प्यात आले असताना सरकार बदलले. नशिबाने त्यांना चाचणी घेण्याची संधी मिळाली. हा प्रश्न श्रेय वादाचा विषय नसून दुष्काळी जनतेला पाणी मिळते आहे याचा आनंद आहे.