Haryana Lok Sabha: भाजपचे 60% उमेदवार पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसवाले

Haryana Lok Sabha Election 2024 – निवडणुका तोंडावर आल्या की नेत्यांकडून पक्षांतर केले जाणे ही बाब आता सामान्य झाली आहे. पूर्वी हा प्रकार होत नव्हता अशातला भाग नाही. मात्र आता ज्या घाउकपणे नेते पक्ष बदलतात, ताबडतोब दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि त्यांना लगेचच नव्या पक्षाचे तिकीटही मिळते हे इतक्या वेगाने होते आहे ते पूर्वी होत नव्हते.

हरियाणात लोकसभेच्या जेमतेम १० जागा आहेत. येथे भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातील ६ जण हे मुळचे कॉंग्रेसवाले आहेत. अर्थात भाजपच्या उमेदवारांपैकी ६० टक्के उमेदवारी जुने कॉंग्रेसी आहेत.

नवीन जिंदाल आणि रणजीतसिंह चौटाला हे याचे ठळक उदाहरण. भाजपने या दोघांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तिकिट मिळण्याच्या काही वेळ अगोदरच त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा उरकला होता. जिंदाल यांना कुरूक्षेत्र येथून तर चौटाला यांना हिसार येथून रिंगणात उतरवण्या आले आहे. पूर्वी हे दोघे कॉंग्रेसमध्ये होते.

आम आदमी पक्षाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष अशोक तंवर यांनी २० जानेवारी रोजी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपमध्ये जाण्यापूर्वी ते कॉंग्रेस पक्षात होते. ते हिसार येथील खासदार होते आणि हरियाणा कॉंग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसला रामराम केला होता.

पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि रोहटक येथून भाजपचे खासदार असलेल्या अरविंद शर्मा यांनाही भाजपने उमेदवारी दिली. तत्पूर्वी ते सलग तीन वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते.

दरम्यान, भाजपमध्ये दाखल झालेल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करताच लगेचच उमेदवारी दिली जात असल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होतो आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षात असेही दोन गट निर्माण झाले आहे. एका गटाला वाटते पक्षश्रेष्ठी जे करत आहेत ते योग्यच आहे. तर दुसरा गट असा आहे की त्यांना वाटते त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कोणी नाही.