Haryana Lok Sabha Elections: भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान

हिसार – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला काही ठिकाणी विरोध सहन करावा लागतो आहे तर काही ठिकाणी बंडखोरांनीच पक्षाला आव्हान दिले आहे. दिल्लीतच्या लगतच्या हरियाणातील फरिदाबाद येथे असाच काहीसा प्रकार आहे. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना भाजपने येथून उमेदवारी दिली आहे.

तथापि, भाजपचे माजी आमदार सुभाष चौधरी यांनी पक्ष उमेदवाराच्या ऐवजी कॉंग्रेसचे उमेदवार महेंद्र प्रताप सिंह यांना पाठिंबा दिला आहे. यातील गमतीचा भाग म्हणजे सुभाष चौधरी यांना कृष्ण पाल गुर्जर यांनीच भाजपमध्ये आणले होते. त्यांनाच आता चौधरी यांच्या बंडाळीचा सामना करावा लागतो आहे. (Haryana Lok Sabha Elections: Challenges of insurgency before BJP)

हिसारमध्येही भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. पक्षाकडून तिकिट मागणाऱ्या कुलदीप बिश्‍नोई यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. भाजपने हिसारमधून रणजीत चौटाला यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र बिश्‍नोई अद्याप त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडून बिश्‍नोई यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप त्यांना यश आले नाही.

चौटाला यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही बिश्‍नोई आणि त्यांचे आमदार पुत्र भव्य बिश्‍नोई गैरहजर होते. कुलदीप बिश्‍नोई कॉंग्रेसला रामराम करून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या मुलाला म्हणजे भव्य यांना भाजपने आदमपूर येथून तिकिट देऊन आमदार केले.

बिश्‍नोई यांची मनधरणी करण्यासाठी आता भव्य यांना भाजपच्या युवा मोर्चाचे प्रभारी पदही देण्यात आले आहे. त्यावरून हिसारची जागा जिंकणे आणि त्याकरता बिश्‍नोई यांची समजूत काढणे भाजपसाठी किती महत्वाचे बनले आहे हे स्पष्ट होते आहे.