ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे… आरोग्याचा मंत्र

-मृणाल गुरव

वय झाल्यानंतर-निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्‍न बहुतेक सर्व ज्येष्ठांपुढे पडतो. त्यांच्यासाठी एक सोपा मंत्र सांगितलेला आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:’ पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इत्यादी अधारणीयवेग निर्माण होण्यास, त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी राहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तूप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.

आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्‍य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेलमर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळ तेल हे सर्वश्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडेतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्‍यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो.

उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे. वार्धक्‍यातील आहार-सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतु त्यासाठी जठराग्नी चांगला प्रदीप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. खाण्यापिण्यात-पचनातही म्हातारपणी काही अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे समतोल किंवा चौरस आहार घेता न येणे. स्त्रियांना त्यांच्या काटकसरी स्वभावामुळे आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही, या धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते. त्याचबरोबर म्हातारपणी आता काय करायचेत जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून आपोआप व्यक्त होणाऱ्या इच्छा तशाच दडपल्या जातात.

म्हातारपणी एकभुक्त म्हणजे एकदाच जेऊन राहावे असा गैरसमज खरे तर अगदी दृढसमज असतात, त्यासाठी आयुर्वेद सांगतो निसर्गाला शरण जा. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, भूक नसेल तर पाणीसुद्धा पिऊ नका. आपल्या समाजामध्ये सर्वसाधारणपणे घरकाम व संसाराची जबाबदारी स्त्रियांवर सुपूर्द केलेली असते, पण पुरुष मात्र व्यवसाय व अर्थकारण सांभाळतात. निवृत्त झाल्यानंतर अशा कामकरी व्यक्तींच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. काही करण्यासारखं नाही असं वाटायला लागलेलं असतं. साधारणपणे निवृत्तीच्या वयाच्यावेळी कोणत्याही व्यक्तीची कार्यक्षमता पूर्णपणे वाढीला लागून ही सर्वोत्तम पातळीची असते. त्यामुळे निवृत्त व्यक्ती ही रिकामटेकडी, निरुपयोगी व अनावश्‍यक आहे, असे मानणं हे चुकीचं असते.

अकुशल कामगारांच्या बाबतीत मात्र अशी परिस्थिती नसते. ते निवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांचं हातावर पोट असतं. दिवसा कमावलं नाही तर रात्री खाण्याचे हाल असतात. औद्योगीकरण झालेल्या शहरात अशा प्रकारची सक्ती जर परिस्थितीने निर्माण झाली, तर काम करू न शकणाऱ्या वयस्कर व्यक्ती हे एक समाजापुढे मोठं संकट निर्माण होईल. वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत शारीरिक ताकद कमी झालेली असते, मानसिक इच्छा कमी झालेली असते. पण आयुष्याचा अनुभव गाठीशी असतो, परिस्थितीचा साकल्याने विचार करण्याची क्षमता आलेली असते. अडचणींवर मात करण्याची परिणामकारक उपाययोजना कोणती हे ठरवण्याची परिपक्वता आलेली असते. त्यामुळे मुलगा व वडील यांच्यामध्ये पडणारे पिढीचं अंतर हे नातू व आजोबा यांच्यामध्ये मात्र कमी झालेलं दिसून येते.

वयस्कर व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या बहुतेक मानसिक तक्रारींचं मूळ हे निवृत्तीनंतर आलेल्या रिक्तपणामध्ये असतं असं म्हणता येईल. त्यामुळे निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं काढायचं हे अगोदरपासून व्यवस्थित ठरवणं व त्याची आखणी करणं हे शहाणपणाचं ठरेल. अगोदरच्या वयामध्ये जे जे करायची इच्छा होती, आवडी निवडी होत्या, जे छंद जोपासायचे होते-जसे बागकाम करणे, संगीत शिकणे, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक करणे, या व अशा अनेक गोष्टी निवृत्त झाल्यानंतरच्या काळामध्ये करता येण्यासारख्या असतात. कमावलेल्या पैशांची सुयोग्य आखणी व सुविहीत ठेव योजना ह्यांच्याद्वारे वृद्धापकाळ विनाकष्ट व विनाअडचणींचा काढण्यास सोपं जाईल.

निरनिराळ्या कार्यक्षेत्रात काम केलेल्या वयस्कर नागरिकांचा एक गट जमवून समाजामधील गरजू घटकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा करून देणं, सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, ह्या गोष्टी वयस्कर नागरिकांना करता येते. अध्यात्म वा तत्सम विषयांची आवड असणारे त्या विषयाचा अभ्यास करू शकतील. स्त्रियांच्याबाबतीत सुध्दा हे सर्व शक्‍य आहे काही स्त्रिया समाजकार्य म्हणून समाजातील निम्नस्तरातील अडचणी समजावून घेऊन त्यांच्या अडचणींचं निवारण करण्याचा प्रयत्न करू शकतील.

Leave a Comment