आरोग्यसेवा उत्तम त्यामुळे दरवाढ योग्यच – आयुक्त शेखर सिंह

 

पिंपरी, दि. 18, (प्रतिनिधी) -शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात आठ मोठी रूग्णालये, 28 दवाखाने, 20 आरोग्य केंद्र आहेत. तसेच शहरातील विविध भागात जिजाऊ क्‍लिनिकचेही कामकाज सुरू आहे. पालिकेच्या वायसीएम रूग्णालयाबाबत काही तक्रारी असतील. मात्र, महापालिकेची आरोग्य सेवा, रूग्ण सेवा उत्तम दर्जाची असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. तसेच महापालिका रूग्णालयात केलेली दरवाढ ही योग्यच असल्याचेही सिंह म्हणाले.

तत्कालीन आयुक्‍त राजेश पाटील यांनी महापालिका पुरवित असलेल्या वैद्यकीय सेवांमध्ये दरवाढ केली होती. याचा मोठा प्रमाणावर विरोध झाला होता. परंतु या विरोधाला न जुमानता पाटील यांनी आपला निर्णय कायम ठेवला. नवीन आयुक्‍त आल्यानंतर या निर्णयात बदल होण्याच्या चर्चा होत्या. परंतु सिंह यांनी महापालिकेची आरोग्य सेवा उत्तम असून करण्यात आलेली दरवाढ योग्यच असल्याचे सांगत पाटील यांच्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.

आयुक्त सिंह म्हणाले की, महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी येत आहेत, याबाबत आयुक्त सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, महापालिकेच्या रूग्णालयातील आरोग्य सेवा अतिशय उत्तम आहे. त्या तुलनेत रूग्णालयातील दर अतिशय कमी होते. त्यामुळे पालिकेच्या रूग्णालयात राज्य सरकारच्या दराप्रमाणे दरवाढ केली असून ही दरवाढ जास्त नाही. तसेच वायसीएममध्ये औषधांची कमतरता असेल तर याचाही आढावा घेतला जाईल, असेही सिंह म्हणाले.