पुणे | तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचे संकट

पुणे, {सागर येवले} – शहरातील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारचा चटका तर असह्य करणारा आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन हवामान विभाग आणि डाॅक्टरांकडून करण्यात आले आहे.

अनेक वर्षानंतर पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमान 43.5 अंशावर जाऊन पोहोचले आहे. यंदा मार्च महिन्याच्या अखेरीपासून पाऱ्याने 40 शी पार असून, तो खाली आलाच नाही. त्यामुळे मागील दीड महिना कडक उन्हाचा गेला आहे, तर पुढील महिन्यात तर कमाल तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मे च्या पहिल्या आठवड्यात शहराच्या सर्वच भागातील कमाल तापमान 43 अंशांच्या पुढे जाणार असल्याने, काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हे तापमान अंगाची लाहीलाही करणार असून, उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. विशेषत: घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनी दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

पोलिस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, उद्योग व्यवसायातील सुरक्षा अधिकारी, कामगार यांना उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण द्यावे. बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टँड, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावली, पाण्याची व्यवस्था आणि उष्माघाताबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स/बॅनर्स लावावेत. उद्याने दुपारी 12 ते चार या वेळेत खुली ठेवावीत.

आरोग्य केंद्रांत स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था, आवश्यक औषधसाठा आणि जलद प्रतिसाद टीम (RRT) तयार करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे, तसेच वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण आणि पाण्याचा पुरवठा असावा. शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी शेतकरी मित्रांचा वापर करावा. उद्योग व्यवसायातील मजुरांना पुरेसा निवारा आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्राण्यांची विशेष काळजी, औषधे, पुरेसे पाणी, हिरवा चारा आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी.

विद्यार्थ्यांची घ्या काळजी…
सध्या काही शाळा सुरू असून, उन्हाची तीव्रतेमुळे शाळा, महाविद्यालयांच्या वेळेचे नियोजन करावे. थंड वर्गखोल्या, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. दुपारी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ टाळावे. परीक्षा सकाळच्या सत्रातच घ्याव्यात. माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ओआरएस द्यावे.

प्रचारसभा सकाळी अथवा संध्याकाळी घ्याव्यात
निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, रॅली, सभा यांच्या वेळा सकाळी किंवा सायंकाळी ठेवाव्यात. जेणेकरून पोलिसांना आणि नागरिकांना उन्हाचा त्रास होणार नाही. पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा किंवा बूथ उभारणी करावी. प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.

खबरदारी म्हणून हे करा
– तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या
– प्रवासात पिण्याचे पाणी सोबत असावे
– ओआरएस, लिंबू पाणी, ताक/लस्सी, फळांचे रस घ्या
– पातळ, सैल, सुती, हलक्या रंगाचे कपडे घालावे
– छत्री, टोपी, टॉवेल, पारंपरिक साधनांचा वापर करा
– थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा टाळा

यांनी घ्यावी अधिक काळजी…
– अर्भक आणि लहान मुले
– घराबाहेर काम करणारे लोक
– गर्भवती महिला
– मानसिक आजारपण असलेली व्यक्ती
– वृद्ध, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब

उन्हाची तीव्रता अधिक वाढल्यामुळे नागरिकांनी दुपारी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या मनपा आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावन्या. – डाॅ. सूर्यकांत देवकर सहायक आरोग्य अधिकारी

उष्माघाताची लक्षणे
– मळमळ, उलटी होणे
– डिहायड्रेशन, चक्कर, थकवा येणे
– रक्तदाब वाढणे, बेशुद्ध होणे
– जास्त ताप येणे, घाम न येणे

अशी घ्या उष्माघाताच्या रुग्णाची काळजी
– रुग्णाला प्रथम सावलीच्या ठिकाणी न्या
– कपडे त्वरित सैल करून अंग थंड पाण्याने पुसत राहा
– खोलीतील पंखे / कुलर्स / एसी त्वरित चालू करा
– शुद्धीवर आल्यानंतर थंड पाणी, ओआरएस द्या

घराची घ्या अशी काळजी
– वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवा
– घर थंड ठेवा; पडदे, शटर किंवा सनशेड वापरा
– खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा
– पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड वापरा