Weather Update : राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; यलो अलर्ट जारी

पुणे – मुंबई, पुणे, ठाणे, पालघरवर बुधवारीही अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

याशिवाय पुणे शहरात देखील पुन्हा पावसाची शक्यता आहे. उद्या पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसापासून संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

यासह मुंबईत पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी 50-60 किमी/तास वेगाने वाऱ्याचा वेग येऊ शकतो. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची वर्दी मिळाली आहे.

अंदमान-निकोबार बेट समुहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. तसेच यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 106% पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.