क्‍यार वादळामुळे कर्नाटकमध्ये किनारपट्टीवर जोरदार पाऊस

नवी दिल्ली : भारताच्या किनारपट्टी भागात क्‍यार चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे.आज सकाळपासूनच पश्‍चिम किनारपट्टीवरील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. चक्रीवादळाने इथल्या मच्छिमारांचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, जवळपास शंभरपेक्षा जास्त जहाजांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तसेच हजारो स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


ऐन दिवाळीत आलेल्या या पावसामुळे देशातील काही भागांमध्ये थैमान घातले आहे. कर्नाटकच्या पश्‍चिम किनारपट्टीवर क्‍यार चक्रीवादाळामुळे अनेक मच्छिमारांना फटका बसला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीवरही क्‍यार चक्रीवादळाचा फटका बसला आहे. रत्नागिरीपासून पश्‍चिमेला 200 किलोमीटरवर असलेल्या क्‍यार चक्रीवादळाचा मोठा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. कोकणात किनारपट्टीवरील काही लोकांच्या घरामध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे. त्याचबरोबर दक्षिण कोकणातील खाड्यांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे..

कोकणात अनेक ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पडतो आहे. ऐन दिवाळीमध्ये क्‍यार चक्रीवादळामुळे दक्षिण कोकणातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांच्या घराच्या परिसरात पाणी शिरल्याचे शनिवारी सकाळी दिसले. समुद्रालाही या भागात उधाण आले आहे.

दक्षिण कोकणातील खाड्यांमधील पाणी पातळी वाढली मालवण, वेंगुर्ला या दक्षिण किंवा तळ कोकणातील खाड्यांमधील पाणी पातळीत शुक्रवारपासून मोठी वाढ झाली आहे. क्‍यार चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसला आहे. अनेक मच्छिमारांच्या बोटी वाहून गेल्या आहेत. क्‍यार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक मच्छिमारांना समुद्रातून सुरक्षित स्थळी आणले आहे.

Leave a Comment