सावधान…बर्ड फ्लूची पुण्याच्या सीमेवर धडक

पुणे – जिल्ह्यातील दौंडपाठोपाठ पुणे शहराच्या सीमेवरील मुळशी तालुक्यातील प्रकल्पातील तब्बल 5,139 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या पोल्ट्री परिसरातील एक किलोमीटरचे क्षेत्र बाधित तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पुढील 21 दिवस प्रतिबंध आदेश लागू करण्यात आला असून, कुकुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा आयोजित करण्यास बंदी आहे.

 

 

दौंड तालुक्यातील मौजे बोरीबेल येथे 418, मुळशी तालुक्यातील मौजे नांदे येथील 5,139 कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यावर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे समोर आले. त्यानंतर या दोन्ही पोल्ट्रीमधील कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यानंतर एक किलोमीटर परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.

 

 

या दोन घटनांमुळे जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूचा प्रसार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राज्य पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुकुट पक्ष्यांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांची विल्हेवाट लावण्यासाठी जलद कृती दलास आदेश देण्यात आले आहे.

Leave a Comment