पुणे | आंब्यांच्या आवकेची लपवाछपवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गोड आंब्याचा हंगाम आता जोरात सुरू झाला आहे. मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, आंबा आवकेमध्ये सध्या सर्व गोलमाल सुरू झाला असून, व्यापारी आणि समितीची आवकमध्ये मोठी तफावत समोर येवू लागली आहे. त्यामुळे यंदा आंबा हंगाम चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळ बाजारात सध्या दररोज कोकण हापूस आणि कर्नाटक सह परराज्यांतील आंब्याची एकूण सुमारे १० हजारांहून अधिक पेट्यांची आवक होत आहे. पाडव्यापासून म्हणजेच आठवड्याने ही आवक दुप्पट ते चौपट होईल. अतिरिक्त आवक ठेवण्यासाठी बाजार समितीकडून मोकळ्या जागेत मोठे शेडही उभारण्यात आले आहे. तेथे आवक सुरू झाली आहे.

मात्र, यापूर्वीच बाजार समितीकडून आंबा आवक घेण्यात गोलमाल सुरू झाला आहे. बाजार समितीकडून सांगितली जाणारी, बाजारात प्रत्यक्ष आवक आणि व्यापारी यांच्याकडून सांगितली जाणारी आवक यामध्ये तफावत आढळून येत आहे. पुणे बाजार समितीत शेतमाल आवक लपवाछपवी हे समीकरण नवे नाही. दरवर्षी असे प्रकार सुरू असतात. आता मात्र संचालक मंडळ असूनही, मर्जीतल्या आडत्यांकडून आंबा आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात लपवाछपवी सुरू झाल्याची चर्चा बाजारात आहे.

आंब्याच्या आवकची लपवाछपवी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. मार्केट यार्ड आणि नव्याने उभारलेल्या शेडमधील आंब्याचा आवकची नोंद पारदर्शकपणे व्हावी, यासाठी बाजार पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची नेमणूक केली जाईल. त्याच्यासोबत इतर कर्मचार्‍यांची नियुक्तीही असेल. – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे