‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये हत्तींच्या वापरावर बंदी आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मदुराई – तामिळनाडूतील मंदिरांमध्ये हत्ती पाळण्यावर बंदी घालण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. वास्तविक, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये सिंगल बेंचने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये हत्ती ठेवण्यावर बंदी घातली होती.

एचआर आणि सीई (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्‌स) विभागाच्या मुख्य सचिवांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही अंतरिम स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाच्या आदेशाला याचिकेत आव्हान देण्यात आले होते.

या वर्षी मार्चमध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने आपल्या एका निर्णयात प्राण्यांबाबत होत असलेली क्रूरता रोखण्यासाठी तामिळनाडूमधील मंदिरांमध्ये हत्तींच्या वापरावर बंदी घातली होती.

हायकोर्टाने अधिकाऱ्यांना सर्व मंदिरांना भेटी देऊन हत्तीला मंदिर प्रशासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीने खाजगीरित्या ठेवले आहे की नाही हे तपासण्याचे निर्देश दिले होते. बंदिस्त हत्तींना सरकारी पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. न्यायालयाने पर्यावरण आणि वन विभागाला या संदर्भात हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोमेंट्‌सच्या सचिवांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते.