साबुदाणा-भगरीला उच्चांकी दर

पुणे – नवरात्रीचे उपवास रविवारपासून सुरू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीला महागाईची झळ बसली आहे. तिन्ही पदार्थांना आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळत आहे. मागणी आहे, मात्र ती नेहमीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.

लोढा म्हणाले, “देशात तामीळनाडूतील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणा उत्पादन घेतले जाते. तेथून संपूर्ण देशात पुरवठा होतो. मात्र, यंदा तेथे पाऊस कमी झाला. परिणामी, उत्पादन कमी झाले आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज 150 ते 200 टन आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही कमी आहे.

नवरात्रौत्सव काळात येथे दररोज 250 ते 300 टन आवक होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबुदाणाला किलोला तब्बल 15 रुपये जास्त भाव मिळत आहे. 15 दिवसांपूर्वीही भावात 3 ते 4 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आता 2 रुपयांनी घसरण झाली आहे.’

शेंगदाणाविषयी ते म्हणाले, “पंधरा दिवसांपूर्वी बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा होता. मात्र, आता सुरळीत आवक सुरू झाली आहे. सध्या भाव तेजीत आहेत. मात्र, दिवाळीत आवक वाढेल. त्यावेळी भावात घसरण होण्यास सुरुवात होईल. सध्या गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक येथून शेंगदाण्याची दररोज 100 ते 150 टन आवक होत आहे.

हायजेनिक फूड म्हणून ओळख निर्माण झालेल्या भगरीचे भावही तेजीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के जास्त भाव मिळत आहे. तामीळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून भगरीच्या कच्च्या मालाची आवक होते. तेथून नाशिक जिल्ह्यात प्रक्रिया करून माल येथील मार्केटयार्डात दाखल होत असतो. दररोज सुमारे 100 टन भगरीची आवक होत आहे.

पदार्थ             घाऊक बाजारातील दर (प्रति किलो)
साबुदाणा                 180 रु.
साबुदाणा                 277 रु.
साबुदाणा                372 रु.
स्पॅनिश                 125-135
घुंगरू                  115-125
हलका                 100-110
टीजे                    100-105
भगर                   1100-105
भगर                   295-100