जेजुरीला शिवकालीन, पेशवेकालीन इतिहास

शिवराज झगडे

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर गडकोट आवार, शहरातील प्रमुख तीर्थस्थळे, मंदिरे, पुरातन वास्तू यांना शिवपूर्वकालीन-शिवकालीन आणि पेशवेकालीन इतिहास आहे. राज्यातील अनेक नामवंत सरदार घराणी, राजे महाराजे यांनी येथे बांधकामे, मंदिरे, तीर्थस्थळे निर्माण केल्याचे उल्लेख आढळून येतात.

मुळात जेजुरी हे प्राचीन, ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराजा होळकर, पंतप्रतिनिधी पेशवे, चांभळीकर सरनाईक, सरलष्कर दरेकर, बडोदेकर गायकवाड, नागपूरकर भोसले, पानसे यांचे दगडी बांधणीचे चिरेबंदी वाडे (छत्रपतींचा राजवाडा) येथे अस्तित्वात होते. आजही काही आहेत. खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये अनेक जातीधर्मातील समाजबांधवांना मानपान असल्याने 32 समाजबांधव येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

जेजुरी गडकोट आवारातील मुख्य मंदिराला 12व्या व 13व्या शतकातील इतिहास आहे. सुमारे 12 ते 13व्या शतकानंतर येथे उपमंदिरे, ओवऱ्या, सज्जा, दीपमाळा, वेशी, पायरीमार्ग यांची कामे झाल्याचे उल्लेख आढळतात; मात्र त्यानंतर 18व्या, 19व्या शतकात कामे झाल्याचे उल्लेख आढळत नाहीत. दराचे अभ्यासक-संशोधक आणि तत्कालीन पुणे विद्यापीठाचे मराठी इतिहासाचे विभाग प्रमुख प्रा. ग. ह. खरे यांनी 1945 ते 1955 या कालावधीत प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून महाराष्ट्रातील चार तीर्थस्थळे पुस्तकातून उल्लेख केला आहे.

यात मोडीलिपीतील जुने दस्त अभ्यासले आहेत. पुस्तकामध्ये 150 वर्षांतील जेजुरी गडकोट आवारातील घटनांचा तपशील नोंदवला आहे. चैत्र वध्य 1682 (1 एप्रिल 1760)या कालच्या पत्रावरून जेजुरीच्या देवाला धारवाड येथील 500 रुपये उत्पन्नाचा गाव तसेच गोदावरीतिरी एक गाव इनाम दिल्याचे व याची जबाबदारी नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांना दिल्याचे उल्लेख आहेत.

होळकर घराण्याकडून मोठी रक्कम देवाच्या सेवेसाठी, धार्मिक विधी जत्रा यात्रा, दैनंदिन खर्चासाठी वापरली जात असल्याचे उल्लेख आहेत. 30 मार्च 1790 रोजी गडावर 300 ते 400 भाविक अचानक मृत्युमुखी पडले. विषबाधा किंवा गुदमरून मृत्यू झाला असावा त्यासाठी सरकारकडून (पेशवे) विठ्ठलपंत वाकनिस यांची चौकशीसाठी नियुक्ती केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे.

तीन महिन्यांपासून विकासकामे सुरू
सध्याच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 379 कोटी रुपयांची तरतूद करून पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या माध्यमातून खंडोबा, मंदिर, आवार, गडकोट, पायरीमार्ग, तीर्थस्थळे, दीपमाळा यांना मूर्त व मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. तसेच ज्या नामवंत घराणे आणि राजे महाराजाचा वारसा जतन होणार आहे.