मुंबईनंतर पुणे-सोलापूर मार्गावरही कोसळले मोठे होर्डिंग; घोडा जखमी, पहा Video

Hoarding Collapse On Pune Solapur Road – या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (दि. 13) जोरदार वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथे एक भले मोठे होर्डिंग कोसळले होते. ही घटना ताजी असतानाच आज शनिवारी (दि. 18) पुणे-सोलापूर महामार्गावर गुलमोहर लाॅन्स येथे एक मोठे होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत घोडा जखमी झाला आहे.

पुणे शहर व परिसरात सायंकाळी पाऊस व जोरदार वारा वाहू लागला. जोरदार वाऱ्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील गुलमोहर लाॅन्स येथील होर्डिंग कोसळले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये होर्डिंगच्या खाली एक पिकअप गाडी दबली आहे. तसेच घोडा जखमी होऊन पडलेला दिसत आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरतील मोशी येथेही एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील 20 बाय 40 फुट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. यामध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चर्चेत, प्रशासनाचे कारवाईचे आदेश –

होर्डिंग दुर्घटनांच्या घटना वाढत असल्यामुळे अनधिकृत आणि धोक्याच्या होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशा होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच मात्र आता ते माणसाचा जीवही घेत आहेत. त्यामुळे असे होर्डिंग तात्काळ हटविण्याचे प्रशानाने आदेश दिले आहेत. शहरांमधील होर्डिंग काढण्याचे काम सर्वच ठिकाणी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.