इनामगावच्या पोलीस कन्यांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

मांडवगण फराटा -करोनाविरुद्धच्या लढाईत शिरूर तालुक्‍यातील इनामगाव येथील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणी पोलीस खात्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस दलात कर्तव्य बजावत असल्याने या बहिणींची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत ट्‌विटरद्वारे कौतुक केले आहे.

म्हस्के कुटुंबातील शुभांगी, गिरीजा, कीर्ती अशी पोलीस भगिनींची नावे आहेत. शिरूर तालुक्‍यातील इनामगाव हे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात शेवटचं गाव. वडील भरत म्हस्के यांचे शिक्षण सातवीपर्यंत तर आई मंगल म्हस्के यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झालेले. त्यांना प्रतिभा, शुभांगी, स्मिता या तीन मुली झाल्या. तिघींच्या पाठीवर सिद्धेश्‍वर हा मुलगा. त्यानंतर मनिषा, कीर्ती, गिरीजा या मुली झाल्या. म्हस्के कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह; परंतु परिस्थिती अत्यंत हलाखीची. तरीही यातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी परिस्थितीला आड येऊ दिले नाही.

शुभांगी पवार-म्हस्के या गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून सध्या कार्यरत असून, कीर्ती या कोंढवा वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर गिरीजा याही अतिक्रमण विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत आहेत. करोनाच्या या लढाईत एकाच कुटुंबातील तीनही बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. मुलींची आई मंगल म्हस्के यादेखील सरपंच पदाच्या माध्यमातून समाजसेवेसाठी झटत आहे.

गरीब शेतकरी कुटुंबातून कुठलीही पार्श्‍वभूमी नसतानाही केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत घेत स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठता येते हे तीन बहिणींनी दाखवून दिले. समाजासाठी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक युवक-युवतींसाठी ही यशाची कथा निश्‍चित प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment