वायुसेनेच्या चेतक हेलिकॉप्टरचा सन्मान

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलामधील चेतक हेलिकॉप्टरच्या 60 वर्षांच्या गौरवशाली सेवेच्या सन्मानार्थ, शनिवारी हकीमपेट येथील हवाई दल केंद्रात भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या परिषदेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्‌घाटन केले.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि एओसी-इन-सी ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्यासह अन्य प्रतिष्ठित मान्यवर आणि सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी माननीय संरक्षण मंत्र्यांनी चेतक हेलिकॉप्टरवरील एक विशेष लिफाफा, कॉफी टेबल बुक आणि या हेलिकॉप्टरच्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या चित्रपटाचे प्रकाशन केले.

गेल्या सहा दशकांमध्ये, शांतता आणि संघर्ष या दोन्ही काळात, तसेच एकात्मता आणि संयुक्त कार्याची भावना वाढवण्यात चेतक हेलिकॉप्टरचे योगदान संरक्षण मंत्र्यांनी आपल्या मुख्य भाषणादरम्यान अधोरेखित केले. या हेलिकॉप्टरला इतकी वर्षे यशस्वीरित्या कार्यरत ठेवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे विशेषत: एच ए एल ही सरकारी कंपनी जी 1965 पासून या हेलिकॉप्टरची निर्मिती करत आहे. त्यांच्या अफाट योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. या अनुभवाच्या आधारे एचएएलने अत्याधुनिक हेलिकॉप्टरची रचना, विकास आणि उत्पादन क्षमता कशी तयार केली हे देखील त्यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती…
या सोहळ्यात चेतक, पिलाटस, किरण, हॉक्‍स, अत्याधुनिक हलक्‍या वजनाचे हेलिकॉप्टर आणि हलक्‍या वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्ससह 26 हेलिकॉप्टर्सने केलेल्या लक्षणीय हवाई कसरती सर्वांसाठी लक्षवेधी ठरल्या. या हवाई कसरतींमध्ये आठ चेतक हेलिकॉप्टरद्वारे हिऱ्याच्या रचनेतील शेवटची हवाई कसरत होती, हे हेलिकॉप्टर संपूर्ण देशात उत्तम सेवा प्रदान करत आहे. हे भव्य हेलिकॉप्टर अजूनही सर्व भूप्रदेशांवर कार्यरत आहे आणि तिन्ही सेवेतील वैमानिकांसाठी मूलभूत प्रशिक्षण हेलिकॉप्टर आहे.