रक्त आणि अश्रूने हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? ‘सामना’तून सवाल

मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. यातच आता ‘सामना’ अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. ‘निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?’ असा सवाल सामनातून केला आहे.

काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात?

समृद्धी महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेलही, पण तुमचे हे स्वप्न निरपराध्यांसाठी काळस्वप्न ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या मृत्यूने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे. सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले. राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे.

नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नाही. ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस वृद्धीच होत आहे. गेल्याच महिन्यात या महामार्गावर खासगी ट्रव्हल्स बसच्या भीषण अपघातात सुमारे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. आता शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली. त्यात 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला.

आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे. गेल्या फक्त सात महिन्यांत या महामार्गावरील अपघाती बळींची संख्या 107 एवढी झाली आहे. त्यात सोमवारच्या दुर्घटनेतील 20 दुर्दैवी मृत्यूंची भर पडली. नागपूर ते मुंबई या महामार्गाने प्रवासाचा काळ कमी केला खरा, पण तोच अनेकांसाठी ‘काळ’ बनून त्यांचे जीव घेत आहे. ज्या सरलांबे येथील पुलावर सोमवारची दुर्घटना घडली त्या पुलाच्या कामाबाबतही सरकारची हीच घिसाडघाई सुरू असल्याचा आरोप आहे.

पुलाचे उरलेले 20 टक्के काम पुढील महिनाअखेर पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ कंत्राटदार कंपन्यांना दिले गेले आहे. त्यामुळे रात्रंदिवस, पावसाळी वातावरणातही या पुलाचे काम सुरूच आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने 20 निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला. त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर पाडले. गेल्या महिन्यात लक्झरी बसला झालेल्या अपघातावरून सरकारने संबंधित बस चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मग आता सोमवारच्या दुर्घटनेबाबत काय करणार आहात? कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवणार आणि स्वतः पुन्हा मोकळे होणार!, अशी खरमरीत टीका ‘सामना’तून सरकारवर करण्यात आली आहे.