“आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नियम मोडला तर कसे चालेल?”

अजित पवार यांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका : सायबाचीवाडी शेतकरी मेळावा
जळोची –
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारे अधिकारी व्यक्‍तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली.
बारामती तालुक्‍यातील सायबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, आम्ही जेव्हा पदावर असतो, तेव्हा आम्ही नियम मोडून चालत नाही. आम्ही ज्यावेळी तुम्हाला सांगतो नियमात वागा, रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद करा. मात्र, मुख्यमंत्री फिरताना रात्री एक दोनपर्यंत स्पीकर सुरू असतात.पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम मोडत असतील तर पोलीस तरी काय करणार.

आम्ही पोलिसांना विचारले तर ते म्हणतात, “दादा आमच्या घड्याळात अजून दहा वाजलेच नाही’. त्यांच्याकडे दुसरे उत्तरही नाही. पोलीस तरी कसे म्हणू शकतील रात्री दीड वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात. त्याला आम्ही काय करायचं, नाही तर व्हायची बदली. अशी पोलिसांची अवस्था झाली आहे. याबाबत राज्यपालांना बोललो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष, गट वाढवण्याचे अधिकार आहेत. मात्र, संविधानाने सांगितलेल्या अधिकाराप्रमाणे त्याचे पालन केले पाहिजे. मग ती सामान्य व्यक्ती असो की उच्च पदस्थ, असे म्हणत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दौऱ्यांबाबत पवार यांनी भाष्य केले.

पवार म्हणाले की, तुमच्यात फोडाफोडी करणार आणि त्यातून इकडून तिकडे जाणार आणि आता आमचे 145 पेक्षा जास्त बहुमत झालं. आता आमचा मुख्यमंत्री खरंतर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. कोर्टाने त्याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. कदाचित याबाबत निकाल काय लागेल माहित नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही की काय, अशी शंका येत आहे. बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. म्हणून विस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्या ही 106 आमदारांना वाटतं की, आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्री पद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की, न सांगितलेलं बरं, असे सांगून पवार यांनी भाजपा आमदारांचा चिमटा काढला.

महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम
पवार म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार करीत आहेत. राज्यात विकासकामे ठप्प झाली आहेत. दोघांवर इतका भार आहे की, मुख्यमंत्री आजारी पडायला लागले आहेत. हे मी चांगल्या भावनेने म्हणतोय. यात कोणतेही राजकारण नाही. जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर कामाची वाटणी झाली असती. ते मंत्री काम करीत राहिले असते.

पूर परिस्थितीबाबत सचिवांना सांगितले असता, ते म्हणतात, आम्हाला आदेश पाहिजे. मात्र, आदेश देणाऱ्या सर्व खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही कुठलेही खाते नाही. हे दोघे सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचे काम केले आहे. असे टीकास्त्र अजित पवार यांनी शिंदे सरकारवर सोडले.