पुणे जिल्हा : सभासद होण्यासाठी अटी बदलल्याने प्रचंड गोंधळ

शिक्रापूर सोसायटीची वार्षिक सभा वादळी : पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले

शिक्रापूर – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत सोसायटी सभासद होण्यासाठी अटीत केलेल्या बदलाच्या मुद्‌द्‌यावर वादळी चर्चा होत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तणावपूर्ण वातावरण निवळले.

शिक्रापूर येथील सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच आयोजित केली होती. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय मांढरे, उपाध्यक्ष जालिंदर केवटे, सचिव काळूराम भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सोसायटीचे संचालक निलेश थोरात, गौरव करंजे, दत्तात्रय राऊत, शिवाजी जकाते, संदीप गायकवाड, सुनील भूमकर, अनिल राऊत, चंद्रकला भुजबळ, विमल वाबळे, मधुकर भुजबळ, भाऊसाहेब केवटे, अरुण सोंडे, सिकंदर शेख, हरिभाऊ खेडकर, बाळासाहेब भुजबळ, प्रकाश सोंडे, विजय खेडकर, संपत चव्हाण, हनुमंत दरवडे, पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

यावेळी अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. यानंतर अचानक सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून काम पाहणाऱ्या माया निंबाळकर यांना अचानक कमी करीत कामाचा काही अनुभव नसलेल्या नवीन व्यक्तीची नियुक्‍ती केली. हा विषय चर्चेत आला.

सोसायटी सभासद होण्यासाठी आलेल्या अटीत केलेल्या बदलाचा मुद्दा हा गोंधळाला कारणीभूत ठरला. यावेळी संचालक मंडळाला जाब विचारल्यानंतर सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी चक्‍क हाणामारीवर आलेला हा प्रसंग काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आटोक्‍यात आला.