satara | मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज

दहिवडी, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक २०२४ आदर्श व शांततेत पार पडण्यासाठी मतदानासाठी आवश्‍यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. उज्वला गाडेकर यांनी दिली. या निवडणुकीत माणमध्ये ३ लाख ५० हजार ११ नागरिक मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आवश्‍यक असलेल्या सेवा, वाढत्या कडक ऊन्हाळ्याचा परिणाम लक्षात घेऊन सोयी सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वाढते तापमान विचारात घेऊन मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप जेथे आवश्यक आहे तेथे महिला मतदार व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बसण्याची प्रतीक्षा कक्ष, ओआरएसचे पाकिट यासह फिरते वैद्यकीय पथक इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपले आदर्श मतदान करावे, असे आवाहन असे सौ. उज्वला गाडेकर यांनी केले आहे.

माण तालुक्यात एकूण मतदार : ३ लाख ५० हजार ११ असून यामध्ये पुरुष मतदार : १ लाख ८० हजार २७ एवढे तर महिला मतदार : १ लाख ६९ हजार ९७५ एवढे आहेत. इतर मतदार : ९
व मतदान केंद्र : ३६९ आहेत. तर आदर्श मतदान केंद्र : ३ थीम (जयजवान म्हसवड, जयकिसान तडवळे, हुतात्मा वडूज), महिला चालविणारे मतदान केंद्र : २. युवा मतदान केंद्र २,
दिव्यांग मतदान केंद्र १ असून यासाठी १५०० कर्मचारी आणि शांतता व सुव्यवसस्था राखण्यासाठी ७०० पोलीस कर्मचारी सज्ज असल्याचे सौ. उज्वला गाडेकर सांगितले.