मानवता सेवा हाच खरा धर्म – शोभा धारीवाल

पुणे – नाशिक येथे नुकतेच आर एम डी फाऊंडेशनच्या माध्यमातून 11 कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या 165 बेडच्या सुपर स्पेशालिटी श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल हाॅस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भूजबळ यांनी रुग्ण सेवेसारखी दुसरी सेवा नाही. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा तेवढाच कोरोनाच्या काळात रुग्णांचे जीव वाचविणारा डॉक्टर सुद्धा महत्वाचा आहे. अशी भावना व्यक्त केली.

आज जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या शिकवणीची गरज आहे असे सांगून त्यांनी विविध पार्टीच्या राजकारण्यांनी आचार्य पुलकसागरजी महाराजांचे शांततापर प्रवचन ऐकावे म्हणजे लोकहितार्थ कामांना चालना व अहिंसात्मक वर्तन तयार होईल असे भावनात्मक आवाहनही त्यांनी केले.

श्री रसिकशेठ यांच्या वडिलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला तेव्हाच श्री रसिकशेठ यांनी ठरविले की सर्वसामान्यांना वेळेवर आरोग्य सेवा पुरवली जाईल व त्या अनुषंगाने शिरूर येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली होती. अशी आठवण आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांनी यावेळी सांगितली. रुग्णालयाच्या माध्यमातून मानवता सेवा हाच खरा धर्म असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

उद्धघाटन सोहळ्याची सुरुवात आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांच्या बोधनात्मक प्रवचनाने झाली . शेकडो मंदिर, मज्जीद बांधण्यापेक्षा एखादे रुग्णालय बांधून विविध जाती धर्मातील लोकांची सेवा घडते असे ते म्हणाले . श्री रसिकशेठ यांचा हाच वारसा धारीवाल कुटुंब पुढे नेत आहे. महावीर जयंतीच्या दिवशी महावीर इंटरनॅशनल नाशिक द्वारा भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समितीव्दारे शोभा आर धारीवाल यांना “भामाशाह” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे, असे गौरवोध्दारही त्यांनी काढले.

माझ्या वडिलांनी मदत मागणाऱ्याला कधीच खाली हात परत पाठविलेले नाही असे आर. एम. डी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन यांनी सांगितले.

याप्रसंगी बालन गृपचे अध्यक्ष पुनीत बालन, श्री आभाश्रीजी म. सा. , श्री विभाश्रीजी म . सा ., सुमेरकुमार काळे, नंदलाल पारेख व इतर मान्यवर आणि आमंत्रीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.